नवी दिल्ली – महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांना एकत्र आणत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शरद पवार यांनी भाजपला मोठा धक्का दिला होता. तसेच देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रपतींची भेट घेत हे कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्याच्या रणनीतीमध्येही शरद पवार यांचे प्रमुख योगदान असल्याची माहिती आहे. अशातच आता सोनिया गांधी यांच्यानंतर युपीए अध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
कॉंग्रेस आणि यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधींनंतर कुणाकडे द्यावे यावर अनेक दिवसांमध्ये धुसफूस सुरू होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोनिया गांधी यांच्यानंतर ती जबाबदारी स्वीकारणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
बिहार आणि हैदराबाद महापालिका निवडणुकांनंतर यूपीएच्या अध्यक्षपदी पुन्हा कोण याबाबत चर्चा रंगू लागल्या आहे. सोनिया गांधी यांच्या निवृत्तीनंतर ही जबाबदारी कोणाकडे द्यायची याबाबत चर्चा सुरू आहे. कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र यूपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास राहुल गांधी यांनी नकार दिल्याची माहिती मिळाली आहे.
यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर त्यांना पंतप्रधापदाचे उमेदवार व्हावे यासाठी कॉंग्रेच्या वरिष्ठ नेत्यांनी गळ घातल्याची देखील चर्चा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काहीसा अवकाश असला तरी कॉंग्रेस आतापासून तयारीला लागली आहे. 2019मध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा युपीएकडून करण्यात आला होता.
मात्र त्या निवडणुकीत कॉंग्रेसचा धोबीपछाड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वत: कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत माघार घेतली. त्यानंतर पुन्हा सर्व सूत्र सोनिया गांधींच्या हाती गेली. मधल्या काळात यावरून अनेक वाद आणि गटबाजी देखील झाली. यामुळे येत्या नेमके काय होणार हे पाहाणे महत्त्वाचं ठरणार आहे.