नवी दिल्ली – शैलीदार डावखुरा फलंदाज सुरेश रैना ( Suresh Raina ) पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार असल्याचे सांगितले जात असून लिलाव प्रक्रियेसाठी त्याला चेन्नई सुपर किंग्जकडून मुक्त करण्यात येणार असल्याने या स्पर्धेत आता तो अन्य संघात जाण्याचीही शक्यता आहे.
अमिरातीत यंदा झालेल्या आयपीएल स्पर्धाला प्रारंभ होण्यापूर्वीच रैना मायदेशी परतला होता. करोनाचा धोका असल्याने त्याने हा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. रैनाने सरावाला सुरुवात केली असून सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत खेळणार आहे.
रैना चेन्नई सुपर किंग्ज संघाबरोबर अमिरातीत दाखलही झाला होता. मात्र, चेन्नई संघातील 13 सदस्यांना करोनाची बाधा झाल्यावर रैनाने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी चेन्नईच्या संघाचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी रैनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पुढील वर्षी तो अन्य संघाकडून खेळण्याची शक्यता आहे.
रैनाला जर चेन्नईच्या संघाने कायम ठेवले नाही तर त्याचे भवितव्य हे आयपीएलच्या लिलावात ठरणार आहे. कारण चेन्नईने जर रैनाला आपल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला नाही तर तो लिलावासाठी उपलब्ध होऊ शकेल.