गोकुळकडून गाय दूध खरेदी दरात 2 रुपये तर, म्हशीसाठी 1 रुपये 70 पैसे वाढ
5 लाख दूध उत्पादकांना होणार फायदा
पुणे – गोकुळ दूध संघाने 5 लाख दूध उत्पादकांना संक्रांतीची गोड भेट दिली आहे. गाय दूध खरेदी दरात 2 रुपये तर, म्हशीच्या दुधासाठी 1 रुपये 70 पैसे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना दररोज 24 लाख रुपये अधिक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता अन्य सहकारी व खासगी डेअऱ्यांकडून खरेदी दरात कधी वाढ होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दूध व्यावसायिकांनी विक्रीदरात वाढ केली. शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला 31 तर, म्हशीच्या दुधाला 45 रुपये मिळतात. शेतकऱ्यांसारखीच ग्राहकांची अवस्था आहे. गेल्या महिन्यात तब्बल 4 रुपयांची दरवाढ झाली. त्यामुळे आता दूध खरेदी दरातही वाढ करण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गोकुळने दूध उत्पादकांना दूध खरेदी दरात वाढ करून दिलासा दिला आहे.
गाय दूध दर 27 रुपयांवरून 29 रुपये होणार आहे. म्हैस दूध खरेदी दरात 1 रुपये 70 पैसे वाढ करण्यात आली असून म्हैस दूध खरेदी दर 42 रुपये 30 पैशांवरून 44 रुपये होणार आहे.
वास्तविक पाहता, दूध दरात वाढ करण्यासाठी सर्व दूध डेअऱ्या एकत्र येतात. दरवाढ जाहीर करून ती तत्काळ लागूदेखील करण्यावर भर असतो. या प्रक्रियेत दूध संघांकडून शेतकऱ्यांचा फारसा विचार केला जात नाही. मात्र, गोकुळने केलेल्या खरेदीदरातील वाढीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दूध दरवाढीच्या धर्तीवर आता खरेदीदरदेखील वाढविण्यासाठी डेअऱ्यांनी पावले उचलण्याची शेतकऱ्यांची मागणी जोर धरत आहे.