सोलापूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान साताऱ्यात धो-धो पावसात भाषण केले होते. याची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला आणि श्रीनिवास पाटील खासदार झाले. आजही त्यांच्या या पावसातील भाषणाची जोरदार चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा पवार पावसात भिजल्याने चर्चेत आले आहे.
त्याच झालं असं की, सोलापूरमध्ये आपल्या सहकाऱ्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी भर पावसात शरद पवारांनी एका लग्नाला हजेरी लावली होती. त्यांच्या याच कृतीची आता सर्वत्र चर्चा होत आहे. सोलापूरचे राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर पंत सपाटे यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा काल पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित राहणार होते. मात्र अचानक लग्न सोहळ्या दरम्यान पाऊस सुरू झाल्याने साऱ्यांची तारांबळ उडाली.
पण रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान पावसात शरद पवार यांचे आगमन झाले आणि सर्व मंडळी त्यांच्या स्वागतासाठी पुढे आली. लग्न लागून गेल्याने खूप उशीर झाला होता. त्यामुळे सुरुवातीला शरद पवार येतील की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र आपल्या सहकार्याला दिलेला शब्द पाळत शरद पवारांची भर पावसात ग्रँड एंट्री झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पवारांनी गाडीतून खाली उतरत वधू-वराला आशीर्वाद दिले. सध्या शरद पवारांचा लग्नसोहळ्यातील हा पावसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.