महागडे रेमडेसीवीर इंजेक्शन महापालिकेला भेट
पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला 50 रेमडेसीवीर या इंजेक्शनच्या व्हाईल भेट दिल्या आहेत. यामुळे शहरातील किमान पन्नास नागरिकांना करोनाच्या उपचारावरील महागडे इजेक्शन मोफत उपलब्ध होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. मात्र हे इंजेक्शन महागडे असल्यामुळे गोर गरिबांना विकत घेणे शक्य नाही. याची दखल घेत शरद पवार यांनी राज्यभर इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत. त्यापैकी पन्नास इंजेक्शन पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोफत दिली आहेत.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांच्याकडे सूपूर्द केली.