पुणे – शहराच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात याठिकाणी 10 कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत.
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री जी किशन रेड्डी यांनी यासंदर्भात लेखी आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार मुक्ता टिळक यांनी पत्रकार दिली. इतिहास अभ्यासक उदय कुलकर्णी आणि आर्किटेक्ट कलमदाणी किरण यावेळी उपस्थित होते.
आमदार टिळक म्हणाल्या, शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवारवाड्याला दररोज हजारो पर्यटक भेट देतात. पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपणारे हे ठिकाण आहे. यासंदर्भात आमदार टिळक यांनी इतिहासाचे अभ्यासक
डॉ. उदय कुलकर्णी व पुरातत्व खात्याचे गजानन मंडवले आणि आर्किटेक्ट किरण कलमदानी यांच्याशी चर्चा करून पुन्नरुज्जीवनाचा सर्व आराखडा व यासाठी येणारा खर्चाचा अंदाज केंद्रीय मंत्र्यांना पाठवला होता. या पत्राची दखल केंद्रीय मंत्री रेड्डी यांच्याकडूण घेण्यात आली आहे.
राज्यातील सर्व ऐतिहासिक स्थळांची सुरक्षा व देखभाल केली जाईल, असे आश्वासन पत्राव्दारे देण्यात आले असल्याचे टिळक यांनी सांगितले. त्याअंतर्गत शनिवारवाड्यातील ऐतिहासिक दिल्ली दरवाजा व त्यावरील चित्रे दर्शनी बाजूची भिंत,
निखळलेले दगड पुन्हा बसवणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी 10 कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. यापुढील कामासाठीसुद्धा आपण पाठपुरवा करणार असल्याचे टिळक यांनी सांगितले.