पुणे – दिवाळी सुट्टीनंतर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा आजपासून (दि. 11) सुरू होणार आहे. त्यामुळे दिवाळीतील उर्वरीत सुट्या राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण परीक्षेनंतर किंवा नाताळ अन्यथा उन्हाळा सुटीमध्ये समायोजित करण्यात येईल, असा सूचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. त्याबाबत जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.
करोना प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून ऑनलाइन शाळा सुरू होत्या. सध्या प्रादुर्भाव आटोक्यात आल्यामुळे 4 ऑक्टोबरपासून जिल्ह्यासह राज्यातील शाळा सुरू झाल्या. दरम्यान, दिवाळीमध्ये पंधरा ते वीस दिवसांची सुट्टी असते. मात्र, यंदा 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान दिवाळी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे उर्वरीत सुट्टयांचे काय?
असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याबाबत जिल्हा परिषदेतील झालेल्या शालेय शिक्षण समिती बैठकीत शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या कार्यालयाकडील पत्रान्वये दिवाळीतील उर्वरीत सुट्टी राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण जोडून किंवा नाताळमध्ये देण्यात येईल. अन्यथा उन्हाळी सुट्यांमध्ये या सुट्यांचे समायोजन करण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.