सातारा -राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्ताराचा मुहूर्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याने शिंदे गटातील माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील दहा कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी मंगळवार, दि. 11 रोजी होत असल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा गेल्या एक महिन्यापासून सुरू होती. 30 जून रोजी शिंदे गटाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपच्यावतीने उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणीस यांनी शपथ घेतली होती. या दरम्यान दोन्ही मंत्र्यांनी तीन वेळा दिल्लीचा दौरा केला. 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. त्या दृष्टिकोनातून मुंबईत हालचाली सुरू झाल्याने राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. सातारा जिल्ह्यातील शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होती. त्यादृष्टीनेसुद्धा राजकीय संकेत मिळत आहेत.