सातारा -सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे डॉ. संदीप काटे यांच्या पत्नी डॉ. सुचित्रा काटे यासुद्धा पहिल्या आयर्न लेडी ठरल्या आहेत. त्यांनी एस्टोनियाची राजधानी टॅलिन येथे आयर्न मॅन स्पर्धा 16 तास 48 मिनिटामध्ये पूर्ण करत भारताचा तिरंगा झेंडा फडकवला. असा विक्रम करणाऱ्या त्या जिल्ह्यातील पहिला महिला ठरल्या असून साताऱ्याचे मॅरेथॉन पटू हेमल उपाध्याय यांनी देखील ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करत आयरन मॅनचा किता पटकावला आहे.
सातारा रनर्स फाउंडेशनच्या सक्रिय सदस्या आणि संस्थापक असलेल्या डॉ. सुचित्रा काटे यांनी आपले पती संदीप काटे यांच्या मॅरेथॉनच्या कामात सतत त्यांची मदत केली आहे.
मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सातत्याने मोठमोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाडल्या. यंदाची आयर्न मॅन स्पर्धा एस्टोनियाची राजधानी टॅलीन येथे आयोजित करण्यात आली होती, ही अत्यंत अवघड अशी स्पर्धा डॉ. सुचित्रा काटे यांनी यशस्वीरित्या पूर्ण करत या स्पर्धेत बाजी मारली. 17 तासाच्या या स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा अत्यंत कस लागतो, चार किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर 42 किलोमीटर धावणे हे तीन टास्क वेळेत पूर्ण करावे लागतात. सतरा तासांचा कालावधी असणारी ही अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा सुचित्रा काटे यांनी सोळा तास 48 मिनिटे अशी वेळ नोंदवत पूर्ण केली.