शौर्यपीठ तुळापूर येथे छत्रपती शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा दिन उत्साहात
वाघोली -शौर्यपीठ तुळापूर येथे गुरुवारी (दि.16) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिनमोठ्या उत्साहात पार पडला. श्री शंभूराजेंच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रातून शंभूभक्त तुळापुरनगरीत दाखल झाले होते.
तुळापूर येथे समाधीस्थळी सकाळी भव्य पालखी सोहळा व राज्याभिषेक सोहळा झाला. सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार नीतेश राणे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, आमदार अशोक पवार, सुनील टिंगरे, प्रदीप कंद व हजारो शंभूभक्तांच्या उपस्थितीत समाधीस्थळी मानवंदना देऊन विविध क्षेत्रांतील मान्यवरांना गौरविण्यात आले.
मृणाल कुलकर्णी यांना जिजाऊ गौरव पुरस्कार, पीटर व्हॅन गेट यांना शंभू गौरव पुरस्कार, रामकृष्ण सातव यांना समाज गौरव पुरस्कार, शंकर बोरकर यांना शंभू गौरव पुरस्कार, सर्जेराव वाघमारे यांना बहुजन नायक पुरस्कार, अतिश बारणे यांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रताप मानकर, शिवज्ञा व्हेनचर्स, संभाजी पाटील, गणेश कुटे, तेजस्विनी सामाजिक संस्था, शंकर महाराज शेवाळे, विष्णू सालपे, जय शंभूराजे मित्र परिवार, स्वामीराज भिसे, संभाजी आहेरराव, हेमंत पांचाळ, नीलेश खरे, आदेश नागवडे, शशिकांत मोरे, शिवबा संघटना, रामभाऊ चोपदार महाराज, रामेश्वर शिंदे, हणमंत पडळकर, बाळासाहेब गाडेकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संतोष कुलथे यांनी वेधले सर्वांचे लक्ष
छत्रपती संभाजी महाराजांच्या दर्शनासाठी शंभू भक्तांनी तुळापूर येथे दिवसभर गर्दी केली होती. शंभू भक्तांच्या गर्जनेने सर्व परिसर दुमदुमून गेला होता. लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष कुलथे यांनी तुळापूर येथे मर्दानी खेळ सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. लाठीकाठी मर्दानी खेळ सादरीकरणानंतर उपस्थित शंभू भक्तांनी त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले.