कबीर बोबडे
नगर – नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासन स्तरावर अनेक योजना आखल्या जातात. मात्र, त्या योजनांची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. याच अनुषंगाने बाल मृत्यदर कमी करण्यासाठी प्रसुतीनंतर जन्माला येणाऱ्या बालकांना सुरक्षेच्या दृष्टीकोणातून ठराविक साहित्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यासाठी राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मणाऱ्या बालकांना 2 हजार रुपये किंमतीचे साहित्य असलेली बेबी केअर कीट पुरविण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 2019 पासून होणार होती. मात्र, गेल्या वर्षभरात या योजनेचा जिल्ह्यात कुठलाही प्रचार-प्रसार झाली नाही. त्यामुळे बेबी केअर कीट देखील मिळाले नाही. त्यामुळे ही योजना जाहीर झाल्यानंतर अद्यापही ही योजना लालफितीमध्येच अडकलेली आहे.
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), शासकीय रुग्णालयांमध्ये गरोदरपणीच नाव नोंदणी केलेल्या व त्याचठिकाणी प्रसुत झाल्यानंतर 9 महिन्याच्या आत अर्ज सादर करणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसुतीच्या वेळी नवजात बालकाचे कपडे, टॉवेल, प्लास्टिक लंगोट, तापमापक यंत्र, गादी, 250 मिली अंगाला लावायचे तेल, मच्छरदाणी, छोट्या आकाराचे ब्लॅंकेट, लहान प्लास्टिकची चटई, शाम्पू, खेळणी-खुळखुळा, ानेलकटर, हातमोजे-पायमोजे, आईसाठी हात धुण्याचे लिक्वीड, लोकरीचे कापड, बॉडी वॉश लिक्विड आदी साहित्य एका बेबी केअर कीटमधून पुरविली जाणार असल्याचा शासन निर्णय डिसेंबर 2018 मध्ये पारित झाला होता.
त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 2019 पासून करण्याचे शासनाचे निर्देश होते. मात्र, गेल्या वर्षभरात या योजनेचा कुठेही प्रचार-प्रसार झाला नाही. या योजनेसाठी पाच कोटी रुपयांची पहिल्या टप्प्यात तरतूद करण्यात आली होती. मात्र एवढा सगळा निधी मंजूर होऊनही जिल्ह्यातील नवजात शिशु बालक अद्यापही बेबी केअर फिट च्या प्रतीक्षेत आहेत. गत काही महिन्यांपासून नगर जिल्ह्यातील हजारो महिलांच्या बालकांना बेबी किट मिळालेच नाही हे विशेष आहे.
बालमृत्यू दर कमी करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये जन्माला येणाऱ्या बालकांना बेबी केअर कीट पुरविण्यात येणार असल्याचा योजनेची राज्य शासन स्तरावरून ऑर्डर दिल्या गेली. मात्र, अद्याप आपल्याकडे साहित्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आणखी ही योजना सुरू झालेली नसल्यामुळे एकाही नवजात शिशुला या योजनेचा लाभ मिळाला नाही.
संजय कदम, उप मुख्य कार्य. अधिकारी (बालकल्याण)