दहिवडी – येथील श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात अर्ध्या तासाच्या झुंजीनंतर उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके याने बलाढ्य मल्ल भारत मदनेला बॅक थ्रो डावावर चितपट केले. शैलेशने एक लाख 51 हजार रुपयांचे इनाम जिंकले. या मैदानात झालेल्या चटकदार कुस्त्यांनी शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
अधूनमधून पावसाचे थेंब पडत असतानाही मैदानाला मोठा प्रतिसाद लाभला. गणेश कुंकुले आणि तुषार दुबे यांच्यातील द्वितीय क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सुटली. टाकेवाडीच्या विक्रम घोरपडेने छडी टांग डावावर हरियाणाच्या मनजितसिंगला अस्मान दाखवले. माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव यांचा सुपुत्र निशांत, युवा नेते सिद्धार्थ गुंडगे व माजी नगराध्यक्ष साधना गुंडगे यांचा सुपुत्र प्रद्युम्न, पुतण्या श्रीराम, नगरसेवक सयाजी मोरे यांचे सुपुत्र साहिल व रोहन मोरे यांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंड्या चित केले.
अक्षय तुपे व गणेश गोरे यांनीही आपापल्या कुस्त्या जिंकल्या. या मैदानात सेनादलाचे पैलवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बहुतांश कुस्त्या त्यांनीच जिंकल्या. नामांकित पैलवानांना पै. विपुल गुंडगे यांच्या स्मरणार्थ गदा व सन्मानचिन्हे देण्यात आली.नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, मुख्याधिकारी अवधूत कुंभार व नगरपंचायत यात्रा कमिटीने कुस्ती मैदानाचे नेटके नियोजन केले होते. राजकीय, सामाजिक व कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रा. राजेंद्र जगदाळे यांच्या रांगड्या भाषाशैलीने कुस्तीप्रेमींची मने जिंकली. विशाल खाडे आणि लालासाहेब ढवाण यांनी समालोचन केले.