श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये पुढील वर्षीच्या सार्वजनिक सुट्यांमधून माजी मुख्यमंत्री दिवंगत शेख अब्दुल्ला यांची जयंती आणि शहिद दिनाच्या दिवशीची सुटी वगळण्यात आली आहे. मात्र 26 ऑक्टोबर हा “विलीनीकरण दिन’ म्हणून या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव जी.एल. शर्मा यांनी 2020 या वर्षातील सार्वजनिक सुट्यांची यादी आज जाहीर केली. त्यामध्ये 27 सार्वजनिक सुट्यांचा उल्लेख आहे. गेल्या वर्षीपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरात 28 सार्वजनिक सुट्या असायच्या. त्यामध्ये 13 जुलै रोजी शहिद दिन आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत शेख अब्दुल्ला यांचा जन्मदिन 5 डिसेंबर या दिवशीही सार्वजनिक सुट्या 2020 या वर्षापासून रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र 26 ऑक्टोबर या दिवशी “विलीनीकरण दिन’ म्हणून सार्वजनिक सुटी देण्यात आली आहे.
26 ऑक्टोबर 1947 रोजी महाराजा हरिसिंह यांनी जम्मू काश्मीर भारतामध्ये विलीन करण्याच्या करारनामा स्वीकारला होता आणि दुसऱ्या दिवशी त्यावर स्वाक्षरी करून तत्कालिन गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांना सादर केला होता.
महाराजा हरिसिंह यांच्या सैन्याकडून 1931 च्या आंदोलनकर्त्यांवर केलेल्या गोळीबारामध्ये मरण पावलेल्यांच्या स्मरणार्थ 13 जुलै रोजी शहिद दिन पाळला जायचा. आता या दिवशीची सार्वजनिक सुटीही रद्द करण्यात आली आहे.