शाहूनगरी उजळली

फटाक्‍यांच्या आतषबाजीत रंगले लक्ष्मीपूजन
सातारा (प्रतिनिधी) –दारांवर सजलेली तोरणे, प्रकाशमान आकाशकंदिल, फटाक्‍यांची आतषबाजी, अशा उत्साही वातावरणात सातारकरांनी रविवारी लक्ष्मीपूजन केले. सायंकाळच्या मुहूर्तावर घराघरांमध्ये लक्ष्मीची प्रतिमा, दागिने, धनाची तर व्यापारी पेढ्यांमध्ये खतावणी व संपत्तीची पूजा करण्यात आली. विद्युत रोषणाई व अंगणामध्ये लावण्यात आलेल्या दिव्यांनी आसमंत उजळून गेला होता.

शुक्रवारी वसुबारसेला गोवत्स पूजनाने दिवाळीच्या आनंदपर्वाला सुरुवात झाली. धनत्रयोदशीला आरोग्यदेवता धन्वंतरीची पूजा करण्यात आली. यादिवशी व्यापाऱ्यांनी पारंपरिक चोपडी पूजन करून धणे-गूळ असा प्रसाद वाटला. रविवारी नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजना दिवशी पहाटे लोकांनी सुवासिक तेले व उटणे लावून उत्साहात अभ्यंगस्नान केले. सकाळी वाहने धुवून काढून त्यांना फुलांचे हार घालण्यात आले. सायंकाळी मुहूर्तावर विधिवत लक्ष्मीपूजन करण्यात आले. पूजा झाल्यानंतर लाह्या-बत्तासे, पेढे यांचा प्रसाद वाटण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. फटाक्‍यांच्या आतषबाजीमुळे आसमंतात विलोभनीय दृश्‍य दिसत होते. बच्चे कंपनीसह मोठ्यांनीही फटाके उडवण्याचा आनंद घेतला.

पाडव्याला दागिने खरेदी, गृहप्रवेश, वाहन खरेदी, टीव्ही-मोबाईल-फ्रीजसारख्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे शहरात विविध कंपन्यांच्या शो-रुम्समध्ये गर्दी दिसत होती. बहीण-भावाचे नाते दृढ करणारी भाऊबीज मंगळवारी साजरा होणार आहे. त्यामुळे बहिणीसाठी भेटवस्तू, दागिने, कपडे खरेदीचे नियोजन घराघरात सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून मंदी असलेल्या बाजारपेठेत दिवाळीमुळे थोडा फार उत्साह संचारला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.