एसटी बसेसना उशीर; प्रवाशांची धावपळ

नाशिक, औरंगाबादकडून शहरात येणाऱ्या गाड्यांना उशीर

पुणे – दिवाळीनिमित्त एसटी बसने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शनिवारी (दि.26) नाशिक, औरंगाबादकडून शहरात येणाऱ्या गाड्यांना सुमारे तीन ते चार तास उशिर होत होता. तर रविवारीही सकाळच्या सुमारास काही गाड्या अनियमित वेळेत धावत होत्या. यामुळे अनेक प्रवाशांना शिवाजीनगर स्थानकावर ताटकळत उभे राहावे लागले. तर रात्री प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांवर आरक्षित केलेले तिकीट रद्द करण्याची वेळ आली.

दिवाळी सुट्टीच्या कालावधीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेता एसटी प्रशासनाने जादा गाड्यांची सोय केली आहे. यंदा प्रथमच वाकडेवाडी येथील नव्या स्थानकावरून गाड्या सोडण्यात येत आहे. शहरातील शिवाजीनगर, स्वारगेट, वाकडेवाडी आणि पिंपरी चिंचवड येथून प्रवाशांसाठी सुमारे 1 हजार 200 दिवाळी जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे. याशिवाय इतरही गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मात्र, शनिवारी शिवाजीनगर स्थानकात येणाऱ्या अनेक गाड्यांना तीन ते चार तास उशीर झाल्याचे सांगण्यात आले. विशेषतः नाशिक आणि औरंगाबाद येथून येणाऱ्या गाड्यांना उशीर झाल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. यामुळे त्रासलेल्या काही प्रवाशांनी आरक्षित केलेले तिकीट रद्द केले. यामुळे दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या कित्येक प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

नाशिक, औरंगाबाद येथून येणाऱ्या गाड्यांना उशिर झाल्याने काही प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी बहुतांशी गाड्या नियमित वेळेत धावत आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी जादा गाड्या सोडण्यात येत असून कुठल्याही फेऱ्या रद्द करण्यात येणार नाहीत.

– ज्ञानेश्‍वर रनवरे, आगारप्रमुख, शिवाजीनगर स्थानक

Leave A Reply

Your email address will not be published.