कोल्हापुरात राष्ट्रवादीची पोस्टरबाजी
कोल्हापूर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना मातब्बर उमेदवारांना धूळ चारत कोल्हापुरात कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार विजयी झाले असून जनतेने दिलेल्या कौलामध्ये भाजपला भोपळा मिळाला यामध्ये आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभांचा मोठा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यात झाला. त्यामुळे “बाप हा बापच असतो’ अशी पोस्टरबाजी राष्ट्रवादीकडून करण्यात आल्याने राजकीय वर्तुळा खळबळ उडाली. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आजच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे काही अज्ञातांनी ही पोस्टर्स काढून टाकली.
विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून जनतेने पुन्हा महायुतीला सत्तेसाठी कौल दिला आहे. भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्या तरी त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत. एकहाती सत्ता मिळवण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. भाजपला कोल्हापुरात एकही जागा मिळवता आली नसल्याने जिल्हा “भाजपमुक्त’ झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी “बाप हा बापच असतो’ असा मजकूर असलेले पोस्टर्स लावून भाजपला डिवचले. या पोस्टरवर शरद पवार यांचा मोठा फोटो होता.
कोल्हापुरात भाजपचे दोन आमदार होते. त्यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा पराभव झाला. आ. अमल महाडिक यांना कॉंग्रेसच्या ऋतुराज पाटील यांनी पराभूत केले तर आ. सुरेश हळवणकर यांचा कॉंग्रेसचे बंडखोर प्रकाश आवाडे यांनी धूळ चारली. जिल्ह्यातील सात जागांवर महाआघाडीने विजय मिळवला आहे.
जिल्ह्यात कॉंग्रेसने चार, राष्ट्रवादीने दोन तर जनसुराज्य पक्षाने एका जागेवर विजय मिळवला. कॉंग्रेसमधून बाहेर पडून आमदार झालेले प्रकाश आवाडे हे महाआघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा आहेत. इतर दोन मतदारसंघांत जनतेने शिवसेनेला कौल दिला आहे. 2014 च्या निवडणुकांमध्ये महायुतीने जिल्ह्यात दहापैकी आठ जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता महायुतीकडे फक्त दोन जागा आहेत. चंद्रकांत पाटलांच्या “होमपिच’वर भाजपचा पराभव झाल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मुसंडी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.