शाहडोल (मध्य प्रदेश) – दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आले होते. पतीने भाजीत टोमॅटो टाकल्याचा राग मनात धरून पत्नी घरातून निघून गेली होती. आणि आता, पतीने पत्नीला दोन किलो टोमॅटो भेट दिल्यामुळे रुसलेली पत्नी पुन्हा शांत झाली आणि माहेर सोडून घरी परतली.
शाहडोल जिल्ह्यातील धनपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील बेम्हौरी गावात राहणारे संजीव कुमार वर्मा एक छोटासा ढाबा आणि टिफिन सेंटर चालवतात. 12 जुलै रोजी स्वयंपाक करत असताना त्यांनी भाजीमध्ये तीन टोमॅटो टाकले होते, त्यानंतर पत्नी आरती हिला खूप राग आला आणि ती घर सोडून उमरिया येथे बहिणीच्या घरी गेली. संजीवने आरतीचे मन वळवण्यासाठी आणि घराबाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी कधीही टोमॅटो न वापरण्याची शपथ घेतली होती, परंतु त्यानंतरही आरतीने संजीवचे ऐकले नाही आणि ती आपल्या मुलीसह घरातून निघून गेली.
पत्नी घरातून निघून गेल्यानंतर संजीवने पोलिस ठाण्यात पत्नीच्या हरवल्याची तक्रार नोंदवताना पोलिसांसमोर आपली अग्नीपरीक्षा कथन केली. त्यानंतर पोलिसांनी आरतीशी बोलून तिला समजावून सांगितले आणि पोलिसांच्या समजूतीनंतर आता आरतीला पुन्हा एकदा घरी सोडण्यात आले. आता आरती ही पती संजीवच्या घरी परतली आहे.
त्याचवेळी संजीवने पत्नीची नाराजी दूर करण्यासाठी दोन किलो टोमॅटो भेट दिले. यासोबतच कधीही न सांगता टोमॅटो न वापरण्याचे वचनही आरतीने दिले आहे. पती-पत्नीच्या टोमॅटोवरुन झालेल्या वादातून पत्नी घरातून निघून गेली होती. वुमेन्स एनर्जी डेस्कच्या माध्यमातून दोघांमध्ये समेट झाला आहे. आजकाल टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे देशभरात टोमॅटो चर्चेत आहे.