भ्रष्टाचाराचे आरोप असलेले शाहबाझ शरीफ यांना विदेश प्रवासास बंदी

इस्लामाबाद, दि. 17 – पाकिस्तानातील प्रमुख विरोधी नेते आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे नेते शाहबाझ शरीफ यांना पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रशासनाने विदेश प्रवासास बंदी घातली आहे. शाहबाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

वैद्यकीय उपचारांसाठी विदेशात जाण्याची परवानगी शरीफ यांना नाकारण्यात आली आहे आणि त्यांचे नाव “नो फ्लाय लिस्ट’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला लाहोर उच्च न्यायालयाने शाहबाझ शरीफ यांना उपचारांसाठी विदेशात जाण्याची अनुमती दिली होती.

कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यावर शरीफ 8 मे रोजी उपचारांसाठी लंडनला जाणार होते. मात्र प्रांतीय तपास संस्थेने शरीफ यांना विमानतळावरच अडवले होते. त्यांचे नाव “प्रोव्हिजनल आयडेंटिफिकेशन लिस्ट’मध्ये असल्याने त्यांना देश सोडून जाण्यास तात्पुरती मनाई असल्याचे या अधिकाऱ्यांनी शरीफ यांना सांगितले होते. त्यानंतर शाहबाझ शरीफ यांना दोहाला जाणाऱ्या विमानातून उतरावे लागले होते.

त्यानंतर शाहबाझ शरीफ यांचे नाव “एक्‍झिट कंट्रोल लिस्ट’मध्ये समाविष्ट केले गेले आणि त्याला प्रांतीय मंत्रिमंडळाकडून मंजूरीही देण्यात आली. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत एका विशेष समितीने शाहबाझ शरीफ यांच्या विदेश प्रवासावर बंदी घालण्याची शिफारस केली होती. शेहबाझ शरीफ यांनी जरी वैद्यकीय तपासासाठी लंडनला जाणार असल्याचे सांगितले असले तरी त्यांनी आपल्या आजारपणाविषयी अथवा उपचारांविषयीची कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत.

आपले नाव विदेश प्रवासाच्या काळ्या यादीत टाकण्याला शाहबाझ शरीफ यांनी गेल्याच आठवड्यात आव्हान दिले होते. आपल्याला पूर्वी कॅन्सर झाला होता आणि न्यूयॉर्क, लंडनमध्ये आपल्यावर उपचार झाले होते. तुरुंगात असल्यामुळे गेले 7 महिने आपल्याला उपचार मिळालेले नाहीत, असे ते म्हणाले होते.

मात्र शाहबाझ शरीफ हे थोरले बंधू नवाझ शरीफ यांच्यासाठीचे जामीनदार आहेत. नवाझ शरीफ यांना विदेशातून परत आणण्याऐवजी ते स्वतःच पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशिद अहमद यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.