पुणे : प्रशासनाचे कडक निर्बंध आणि पुणेकरांनी पाळलेली शिस्त फळाला आली असून पुण्यातील करोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहर आघाडीवर होतं. मात्र आता पुण्यात रुग्णसंख्या कमी होत असल्यानं प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
सोमवारी पुण्यातील रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला मिळाली आहे. करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ही तीन आकडी झाल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आनंद व्यक्त केला आहे.
करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर दैनंदिन बधितांची संख्या सोमवारी सर्वात कमी आल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून स्पष्ट केलं. सोमवारी शहरात 684 एवढे नवे रुग्ण आढळून आले असून 2790 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच मृत्यूचा आकडा 66 असून त्यात 23 रुग्ण पुण्याबाहेरचे असल्याची माहिती मिळाली आहे.
#मोठा_दिलासा : नव्या कोरोनाबधितांची संख्या ३ आकड्यात !
नव्या कोरोना रुग्णसंख्येत दिलासा मिळत असताना आज त्यात आणखी भर पडली. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून आज नोंदवली गेलेली रुग्णसंख्या सर्वात कमी आहे.
■ नवे : ६८४
■ कोरोनामुक्त : २,७९०
■ चाचण्या : ७,८६२धन्यवाद पुणेकर !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 17, 2021
पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात येत असून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासाठी पुणेकरांचे आभारही मानले आहेत. पुण्यात सध्या ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा 18440 एवढा आहे. आतापर्यंत एकूण 4 लाख 59 हजार 987 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 7749 रुग्णांनी करोनामुळं प्राण गमावले आहेत.