लाहोर : पाकिस्तानमधील नागरिकांना भारतीय मानोरंजनसृष्टीचे आकर्षण पूर्वीपासूनच आहे भारतात जे चित्रपट गाजतात ते पाकिस्तानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गल्ला जमवतात, याच पार्श्वभूमीवर आता देशामधील एका युनिव्हर्सिटीमध्ये ‘बॉलिवूड डे’ साजरा करण्याचा विषय वादाचा ठरू पहात आहे.
लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्समध्ये गेल्या आठवड्यात ‘बॉलीवूड डे’ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भारतीय मनोरंजन सृष्टीतील शाहरुख खान सलमान खान आमिर खान ऋतिक रोशन आणि अनेक भारतीय अभिनेत्याच्या गाजलेल्या भूमिकांचा पेहराव करून उत्सवाला चार चांद चढवले होते.
सलमान खानचा चुलबुल पांडे किंवा शाहरुख खानचा राहुल आणि रणबीर कपूरचा रॉकस्टार अशा विविध वेशभूषा मध्ये विद्यार्थ्यांनी विद्यापीठात येऊन कार्यक्रम सादर केले. पण भारतीय चित्रपटांना अशा प्रकारे महत्त्व दिल्याचा राग कट्टरपंथीयांना आला असून त्यांनी या महोत्सवाला विरोध केला आहे. दुसरीकडे अशा प्रकारे बॉलीवूड महोत्सव करण्यात कोणताही आक्षेप घेण्याचे कारण नाही अशा म्हणणाऱ्या लोकांचाही गट मोठा आहे.
विशेषता विद्यार्थी आणि युवावर्गाने लाहोर विद्यापीठातील या उपक्रमाचे कौतुक केले असून देशात इतरत्र असे कार्यक्रम घ्यावेत अशी मागणी केली आहे. पाकिस्तानमधील सोशल मीडियावरून या विषयावर दोन गट पडले असून दोनही गट हिरिरीने आपली भूमिका मांडत आहेत. मनोरंजन क्षेत्राला कोणत्याही प्रकारचे धार्मिक वळण किंवा दोन देशातील संघर्षाचे वळण दिले जाऊ नये, अशा प्रकारची भूमिका युवा पिढीने घेतली आहे.
एकीकडे पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना लाहोर विद्यापीठात अशा प्रकारे भारतातील चित्रपटसृष्टीचा महोत्सव साजरा करणे चुकीचे असल्याची टीकाही केली जात आहे. या महोत्सवाचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि ह्या महोत्सवात भाग घेतलेला विद्यार्थ्यांनाही तंबी द्यावी अशा प्रकारची मागणी आता जोर धरू पहात आहे.