लाहोर – पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे उपाध्यक्ष आणि इम्रान खान यांचे निकटचे सहकारी शाह मेहमूद कुरेशी यांना आज पुन्हा अटक करण्यात आली. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सायफर गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर केला होता.
आज सशस्त्र पोलिसांनी व्हॅनमध्ये कोंबून त्यांना रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात नेले.
या अटकेची दृश्य वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाल्यानंतरच या अटकेबद्दलची माहिती सर्वांना समजली. आपल्याला बेकायदेशीरपणे अटक केली जात असल्याचे कुरेशी यावेळी ओरडून सांगत होते. ही कायद्याची चेष्ठा आहे आणि पाकिस्तानमध्ये नागरिकांना राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकारही नाकारण्यात येत असल्याचे पीटीआयच्या एक्स हॅन्डलवर म्हटले गेले आहे.
जामिनाचा बॉन्ड भरण्यापूर्वीच अटकेची कारवाई
कुरेशी आणि इम्रान खान यांना शुक्रवारीच प्रत्येकी १० लाख रुपयांचा जामीन मंजूर झाला होता. मुक्ततेचे आदेश मिळण्यासाठी त्या जामिनासाठीचा बॉन्ड अदियाला तुरुंगात भरणे आवश्यक होते. तो बॉन्ड भरण्यासाठी कुरेशी यांचे कुटुंबीय अदियाला तुरुंगाजवळ आले होते.
मात्र बॉन्ड भरण्यापूर्वीच कुरेशी यांना अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक हिताला बाधा पोचवू शकतील अशा संशयितांना ताब्यात घेण्याचा सरकारला अधिकार असल्याचे सांगितले जाते आहे. मात्र कुरेशी यांना ताब्यात घेण्याचे आदेश मागे घेतल्याचे पोलीस उपायुक्तांचे पत्र माध्यमांकडे उपलब्ध आहे.