संगमनेर -संगमनेर शहरात करोनाचा कहर सुरुच असून, सोमवारी (दि.20) रात्री रॅपिड अँटिजेन प्रणालीद्वारे झालेल्या चाचणीतून 24 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने अवघ्या तालुक्यात खळबळ माजली होती.
त्यानंतर काही वेळातच मध्यरात्रीच्यावेळी शहरातील गजबजलेल्या घरांचा परिसर असलेल्या विद्यानगरमधील एका 48 वर्षीय इसमाचा कोविडच्या संक्रमणातून नगरच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक वार्ता येवून धडकली.
त्यामुळे संगमनेरातील करोना बळींची संख्या 17 वर पोहोचवली आहे. रविवारी (दि. 19) सायंकाळच्यावेळी संगमनेर तालुक्यातील बारा जणांच्या पॉझिटिव्ह अहवालासह शहरालगतच्या कासारा दुमाला येथील 87 वर्षीय वयोवृद्ध इसमासह शिबलापूर येथील 43 वर्षीय व्यक्तीचा करोनाने बळी घेतल्याच्या वृत्ताने संपूर्ण संगमनेर तालुका हादरला होता. मात्र या घटनेनंतर एका दिवसानंतर कोविडने पुन्हा एकदा शहरातील गजबजलेला परिसर समजल्या जाणाऱ्या विद्यानगरमधील 48 व्यक्तीचा बळी घेतला.
कोविडची लागण झाल्यानंतरचे आठ दिवस सदरच्या व्यक्तीने रुग्णालयात जावून उपचार घेण्याऐवजी घरातच उपचार घेतले होते. रविवारी त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने आरोग्य यंत्रणेने त्याला तातडीने नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथे रविवारपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.
मात्र कोविडच्या संक्रमणाला मोठा काळ उलटल्याने व वेळीच त्याने योग्य उपचार न घेतल्याने त्याच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त संगमनेरात येवून धडकले. या वृत्ताने संगमनेरात खळबळ उडाली असून, या इसमाच्या रूपाने कोविडने तालुक्यातील सतरावा बळी घेतला आहे.