पुणे – करोनाबाधित आणखीन दोन जणांचे दुसरे नमुनेही निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना शुक्रवारी (दि.27) घरी सोडले. त्यामुळे आतापर्यंत 19 बाधित रुग्णांपैकी 7 जणांना घरी सोडले आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्ण ठणठणीत होत असल्यामुळे डॉक्टर आणि प्रशासनाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
दुबईहून पुण्यात आलेल्या सिंहगड रोड येथील पहिल्या करोनाबाधित दाम्पत्यांना 14 दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दुसऱ्या दिवशी आणखीन तिघांना तर आज दोन जणांना घरी सोडले आहे. या दोघांचेही नमुने निगेटिव्ह आल्यावर शुक्रवारी सकाळी त्यांना घरी सोडले असून पुढील 14 दिवस या दोघांनीही घरातच थांबायचे आहे. त्यांनी काय आहार घ्यावा, कसे रहावे याबाबतच्या सूचना डॉक्टरांकडून देण्यात आल्या आहेत.
तसेच, राहिलेल्या 12 रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील तीन व्यक्ती खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आता पुढील दोन व्यक्तीचे 14 दिवसांचा कार्यकाळ दोन दिवसांनी पूर्ण होणार आहे. त्यांचीही असाच पद्धतीने दोनवेळा नमुने तपासणी करून घरी सोडले जाईल, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.