सातारा – खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नव्या घंटागाड्यांच्या पूजनासाठी आरोग्य विभागाने गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला. मात्र, या व्यवस्थेत सफाई मोहिमेची घडी विस्कटल्याने सातारा शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील कचऱ्याचे ढीग रोगराईला निमंत्रण देण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे सारे जग करोनाविरूद्धच्या लढाईसाठी प्रयत्न करीत असली तरी सातारा पालिका मात्र बेफिकिर असल्याने संताप व्यकत होत आहे.
साताऱ्यात करोनाच्या संसर्गाची युध्दसदृश्य परिस्थिती असतानाही शहरात कचरा उचलला न गेल्याने आरोग्य विभागाच्या सफाई मोहिमेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गुरुवार परज, सातारा तालुका पोलीस स्टेशन कॉर्नर, प्रतापगंज पेठ, बुधवार नाका, बारटक्के चौक, जुना मोटार स्टॅंन्ड परिसर लक्ष्मी टेकडी (सदरबझार) आदी ठिकाणी कचरा उचलला न गेल्याने करोनाची दहशत असतानाही सातारा शहर शुक्रवारी बकाल दिसत होते. गुरूवारी संध्याकाळी बारटक्के चौकात सगळा कचरा रस्त्यावर येऊन त्यामध्ये गायी दिसत होत्या. खाण्यासाठी डुकरे झुंजत होती. तिथे भटक्या जनावरांसह कुत्र्यांची गर्दी झाली होती.
गुरूवार परज व सदाशिव पेठेमध्ये रात्री नऊनंतर कचरा रस्त्यावर टाकला जात आहे. पोवई नाका, राजवाडा, सदाशिव पेठ भाजी मंडईतही कितीही शिस्तीचा बडगा उगारला तरी शिल्लक भाजीपाला रस्त्यावर टाकून निघून जाण्याची सवय ना शेतकऱ्यांची गेली आहे ना व्यापाऱ्यांची.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पालिकेच्या नव्या घंटागाडयांचे गुढीपाडव्यांचे झटपट पूजन करण्यात आले. मात्र, या व्यस्ततेत सफाई मोहिमेचे वेळापत्रक कोलमडले. सकाळी साडेसात वाजता पहिली फेरी त्यानंतर दोन फेऱ्या असे एक ते वीस प्रभागाचे नियोजन दोन ठेकेदारांना वाटून देण्यात आले आहे.
1 ते 15 प्रभाग एकाकडे व 15 ते 20 प्रभाग एकाकडे असे नियोजन आहे. यापूर्वी शहराच्या पश्चिम भागाची सफाई मोहिम अमित शिंदे यांच्या यशश्री एंटरप्रायजेसला देण्यात आली होती. मात्र, ती सेवा 24 मार्च रोजी संपली आणि 26 मार्चपासून पालिकेच्या घंटागाडयांची सेवा सुरू झाली. चालक व सहाय्यक सेवा ही ठेकेदाराची जवाबदारी आहे. असे नियोजन झाले असले तरी अजून ते कागदावरच आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडला आहे. करोनाचा धोका टाळण्यासाठी पालिकेकड गांभीर्य उरलेले नाही. त्यामुळेच जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. सफाई मोहिमेचे रूटीन अद्याप न बसल्याने कचरा उचलण्यात थोडी अडचण झाली.
मात्र येत्या दोन दिवसांत ही सेवा सुरळीत होईल, अशी हमी घंटागाडी ठेकेदारांनी दिली. शहरातील कचऱ्यांची सचित्र ठिकाणे मुख्याधिकाऱ्यांकडे पोहचल्यानंतर आरोग्य यंत्रणा थोडी सतर्क झाली. गुरूवार परज, राधिका रोड, बाजार समिती येथील कचरा उचलण्यासाठी चार सफाई कर्मचारी व ट्रॅक्टर तातडीने पाठवण्यात आला. असे असले तरी मुख्याधिकाऱ्यांकडे चित्रे पाठवल्यावरच पालिकेला जाग येणार का, असा प्रश्न विचारला जात ओ. सातारा पालिकेचा निष्काळजीपणा करोनाला पूरक ठरू नये, अशी अपेक्षा लोक व्यक्त करीत असून जिल्हाधइकाऱ्यांनी सातारा शहरातून एक फेरफटका मारण्याची मागणी लोक करत आहेत.