कराड / उंब्रज -करोना महामारीचे संक्रमण आता उंब्रजसह कराड तालुक्याच्या ग्रामीण भागात वाढत चालले आहे. शनिवारी दि.22 रोजी उंब्रज येथे जळगांवहून आलेल्या 58 वर्षीय व्यक्तीस करोनाची बाधा झाली तर म्हासोली येथील तिघांना तसेच ढेबेवाडी फाटा कराड येथील तिघांना करोना लागण झाली आहे.
उंब्रज येथील बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील पाच जणांना संस्थात्मक तर लो रिस्क असणाऱ्या सात जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. नवीन बाधितामुळे उंब्रजची करोना संख्या 6 झाली आहे. म्हासोलीची संख्या 17 वर गेली आहे. तर ढेबेवाडी फाटा येथील वाढीव 5 रूग्णांमुळे मलकापूरमधील बाधितांची संख्या 29 वर पोहचली आहे. कराड तालुक्याचा एकूण आकडा 124 वर पोहाचला आहे.
दोन दिवसांपूर्वी उंब्रज करोनामुक्त झाले. मात्र करोनामुक्तीचा आनंद उंब्रजकरांसह कराड तालुक्याला फार काळ घेता आला नाही. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर गावात सोनेचांदीचा व्यवसाय करणारी 58 वर्षीय व्यक्ती उंब्रज येथे आल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. ते येथील एका खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी गेले असता त्यांना सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. स्नेहा निकम यांनी बुधवार दि.21 रोजी त्यांना कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. शनिवारी दि.23 रोजी त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.