50 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

कर्जमाफीची 24 हजार 102 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये आतापर्यंत 50.27 लाख कर्जदार शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले आहे. त्यासाठी 24 हजार 102 कोटी रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट जमा करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

देशातील सर्वांत मोठी ही कर्जमाफी असून यापूर्वी पंजाब राज्याने 10 हजार कोटी रुपयांची, आंध्र प्रदेश 15 हजार कोटी रुपयांची, कर्नाटकने 8 हजार कोटी, तेलंगणाने 10 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. या योजनेत प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरीत्या दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात येते. एकाच कुटुंबातील व्यक्तीचे प्रत्येकी दीड लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आले. नवीन कर्ज घेण्यासाठी कर्जाचे पुर्नगठण करण्यात आले. त्यामुळे नवीन पीक कर्ज घेण्यासाठी कर्जदार शेतकरी पात्र झाला आहे, असे देशमुख म्हणाले.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा 25 टक्के प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. अद्याप कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहाणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.