मंचर-मंचर शहरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने बुधवार (दि. 1) एप्रिलपासुन दररोज दुपारी एक नंतर बंद राहणार आहेत.त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून मंचर शहरातील नागरिक गांभीर्याने घेत नाहीत.
शेजारील जुन्नर तालुक्यात करोनाचा संशयित रुग्ण आढळला असून त्यादृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. गरज नसताना अनेक नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. त्यासाठी बुधवारपासुन अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने दुपारी 1 नंतर बंद ठेवण्यात येणार आहेत, असे सरपंच दत्ता गांजाळे यांनी सांगितले.