पुणे – देशांतर्गत विकसित केली गेलेली न्युमोनियाविरोधी पहिली लस “न्युमोसिल’ आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटने लॉंच केली. न्युमोनियाविरोधी लस विकसित करण्यासाठी सीरम इन्स्टिट्युट, पॅथ, बिल ऍन्ड मेलिंडा गेट्स फौंडेशन दरन्यान गेल्या दशकभरापासून संयुक्तरित्या प्रयत्न सुरू होते.
न्युमोनियाला कारणीभूत होणाऱ्या न्युमोकोकल जीवाणूविरोधात मध्यम आणि अल्प उत्पन्न गटासाठी किफायतशीर दरात प्रभावी लस विकसित करणे हे या प्रयत्नांमागील उद्दिष्ट होते. आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत एका ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान ही लस लॉंच केली गेली.
ही किफायतशीर दरातील लस म्हणजे न्युमोनियापसून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी देशाच्या सार्वजनिक आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. “न्युमोसिल’ या लसीतून 6 ए आणि 19 ए या घटकांचा फायदा नागरिकांना मिळू शकणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या पूर्वीच निश्चित केलेल्या गुणवत्तेनुसार भारतात आढळण्याऱ्या एस युमोनिएइ आणि जगभरात अन्यत्र आढळणाऱ्या अन्य 10 सिरोटाईपचा प्रभाव रोखण्याची क्षमता या लसीमध्ये आहे. त्यामुळे भारताबरोबरच अन्य देशातही न्युमोनियापासून लहान मुलांचे प्रभावी संरक्षण केले जाऊ शकेल, असे सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अदर पूनावाला यांनी सांगितले.
जगभरात न्युमोनियाने दरवर्षी मृत्यूमुखी पडणाऱ्या 5 वर्षांखालील मुलांची संख्या लक्षणीय आहे. भारतात न्यूमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 71 टक्के आहे. तर अतितीव्र न्यूमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 57 टक्के आहे. दरवर्षी देशभरातील 5 वर्षांखालील सुमारे 67,800 बालकांचा मृत्यू न्यूमोनियामुळे होतो.