दौंड : दौंड तालुक्यातील स्वतंत्र प्रांतकार्यालयासाठी राज्य सरकारने राजपत्र आज प्रसिद्ध केले आहे. या सरकारच्या पंचवार्षिकमध्ये राज्यातील तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालयाचा हा पहिलाच निर्णय असून, या प्रांत कार्यालयाचे मुख्यालय दौंडच असणार आहे. अशी माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना कुल पुढे म्हणाले की,गेल्या पाच वर्षात मी केलेल्या पाठ पुराव्याला यश आले असुन महसुल विभागाने नकारात्मक अहवाल सादर केला असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही विशेषबाब म्हणुन दौंडला स्वतंत्र प्रांत कार्यालय करण्याचा निर्णय घेतला आहे.
आघाडी सरकारच्या काळात दोन तालुक्यासाठी एक प्रांत कार्यालय करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दौंड व पुरंदर या तालुक्यांसाठी कार्यालय मंजुर झाले. परंतु या कार्यालयाचे मुख्यालय पुण्यात ठेवण्यात आले. त्यामुळे या निर्णयाला आम्ही आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने दौंड किंवा पुरंदर मध्ये हे कार्यालय सुरू करावे असा निर्णय दिला. मागील आघाडी सरकारमध्ये तत्कालीन दौंडचे आमदार सत्ताधारी होते व पुरंदरचे आमदार विरोधी पक्षात होते तरी देखील हे प्रांत कार्यालय पुरंदर येथे करण्यात आले.
दौंड तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने हे प्रांत कार्यालय अडचणीचे होते म्हणुन माझ्या कारकिर्दीत हे प्रांत कार्यालय दौंडला आणण्यासाठी मी सभागृहात देखील मागणी केली. तसेच शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला होता. महसुल विभाग नकारात्मक असताना देखील महसुलमंत्री व मुख्यमंत्र्यांनी या कार्यालयास हिरवा कंदिल दाखवला आहे. दौंडसाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय झाल्याने नागरिकांची होणारी फरफट थांबणार आहे असेही कुल म्हणाले.
प्रांत कार्यालयाची अधिसुचना प्रसिद्ध झाल्यानंतर रासपचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, जिल्हाध्यक्ष हरिश खोमणे, तालुकाध्यक्ष ताऩाजी केकाण यांच्यावतीने आमदार कुल यांचा सत्कार करण्यात आला.