पुणे – यजमान महाराष्ट्राला आपली आगेकूच कायम राखण्यासाठी आता 11 व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी तमिळनाडूचे आव्हान पार करावे लागेल. दरम्यान, साखळी गटातील अखेरच्या सामन्यात हरियाणाने विजय मिळविला.
येथील पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर परिसरातील मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने गटातील सर्व सामने जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. त्याच वर्चस्वाची पुनरावृत्ती महाराष्ट्राला आता दाखवावी लागणार आहे.
महाराष्ट्राने आतापर्यंत 32 गोल केले असून, त्यातील 13 गोल चार खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नवर केले आहेत. तुलनेत तमिळनाडू संघ देखील अपराजित राहूनच बाद फेरीत दाखल होत आहे. फरक फक्त गोल संख्येत आहे. त्यांनी 18 गोल नोंदवले असून, त्यातील फक्त 5 पेनल्टी कॉर्नवर नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्राने तीन गोल स्वीकारले आहे, तर तमिळनाडूने अजून एकही गोल स्वीकारलेला नाही.
महाराष्ट्राकडून सात, तर तमिळनाडूकडून सहा खेळाडूंनी गोल केले आहेत. महाराष्ट्राचा कर्णधार तालेब शाहने आठ, तर तमिळनाडूच्या सुंदरापंडीने 4 गोल केले आहेत. महाराष्ट्राची ही घोडदौड स्वप्नवत आहे. प्रतिस्पर्धी संघातील लढतीत 2015 साली महाराष्ट्राने तमिळनाडूवर 3-1 असा विजय मिळविला आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत याच मैदानावर हा विजय मिळविला होता. त्यामुळे इतिहास महाराष्ट्राच्या बाजूने आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अन्य लढतीत दोनवेळचे विजेते आणि तीन वेळचे उपविजेते आणि दोनवेळा तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या पंजाबची गाठ त्यांच्या शेजारील राज्य असणाऱ्या चंदिगडशी पडणार आहे. गतउपविजेते कर्नाटक आपली आगेकूच कायम राखण्यासाठी बंगालशी खेळतील. हरियाणा आणि उत्तर प्रदेश ही तिसरी उपांत्यपूर्व लढत होईल. शुक्रवारी अखेरच्या साखळीतील सामन्यातून मध्य प्रदेशाचा 5-1 असा पराभव करताना हरियाणाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ते सहा गुणांसह गटात अव्वल राहिले.