मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाने ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विश्वनाथ महाडेश्वर यांनी मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या दरम्यान मुंबईचे महापौरपद भूषवले होते.
विश्वनाथ महाडेश्वर यांचं पार्थिव दुपारी २ सांताकृझ पूर्व येथील राजे संभाजी विद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता त्यांची अंत्ययात्रा टीचर्स कॉलनी येथून स्मशान भूमीच्या दिशेने निघेल.
दरम्यान, विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनाने ठाकरे गटाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह इतर शिवसैनिक उपस्थित राहतील. गेल्या काही दिवसांपासून महाडेश्वर यांची तब्येत ठिक नव्हती. काही दिवसांपूर्वीच ते कणकवली गावाहून मुंबईला पोहोचले होते.
विश्वनाथ महाडेश्वर यांचा जन्म १५ एप्रिल १९६० रोजी झाला होता. त्यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. तसेच ते सांताक्रूझमधील राजे संभाजी विद्यालयाचे माजी प्राचार्य होते. २००२ मध्ये महाडेश्वर पहिल्यांदा नगरसेवक पदावर निवडून आले. त्यानंतर २०१७ मध्ये ते मुंबईच्या महापौर झाले. २०१७ ते २०१९ या कालावधीदरम्यान त्यांनी मुंबईचं महापौरपद भूषवलं. तसेच २०१९ त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.