पुणे – जगभरातील हवामान बदल आणि उष्णतेच्या कारणांवर खल होत आहे. याबाबत दररोज नवनवीन संशोधन निष्कर्षही समोर येत आहेत. यात आता पक्ष्यांवरही अभ्यास निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. “या हवामान बदलाचा स्थलांतरित पक्ष्यांवर परिणाम होत असून, काही जीवांच्या प्रजनन क्षमतेत घट झाली आहे,’ असे संशोधकांनी म्हटले आहे. हे निष्कर्ष “प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस’ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
49 वर्षे अभ्यास
या आंतरराष्ट्रीय अभ्यासातील संशोधकांनी 1970 आणि 2019 दरम्यान सर्व खंडांमधील 104 पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये वार्षिक प्रजननातील बदलांचे मूल्यांकन केले.
हवामान बदलास कारणीभूत
ठरणाऱ्या घटकांचे मोजमाप, देखरेख आणि असुरक्षिततेचा सामना करणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींना वाचवण्यासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. अन्यथा, मानवी जीवनशैलीमुळे जैवविविधतेचे अस्तित्व विशेषतः असह्य प्रजाती जगातून नामशेष होतील.- जे. पांडियन, वन्यजीव संशोधक
संशोधक म्हणतात…
लहान, स्थानिक पक्ष्यांच्या प्रजातींपेक्षा मोठ्या आणि स्थलांतरित पक्ष्यांवर हवामान बदलाचा अधिक चिंताजनक परिणाम होतो.
हवामानातील बदल हे पक्ष्यांच्या प्रजातींच्या पर्यावरणीय आणि जीवन इतिहासाच्या वैशिष्ट्यांवर आणि पुनरुत्पादनावर परिणाम करत आहेत.
अलिकडच्या दशकभरात पक्ष्यांची सरासरी प्रजनन क्षमता कमी झाली आहे. हे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आहे.
बोलके आकडे
56.7% : पक्ष्यांची प्रजनन क्षमता घटली
43.3 % : पक्ष्यांची प्रजनन क्षमता वाढली
कोणत्या प्रजातींवर कसा परिणाम
स्थलांतरित आणि मोठ्या शरीराच्या पक्ष्यांच्या प्रजातींनी अंडी-पिल्ले पालन कालावधीत संतती उत्पादनात घट अनुभवली.
लहान शरीराच्या, गती कमी असलेल्या प्रजाती अधिक संतती निर्माण करतात.
अधिक प्रमाणात अंडी देणाऱ्या प्रजातींनी वाढत्या तापमानासह पुनरुत्पादनात वाढ दर्शविली