मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेला देखील डिवचले. तसेच मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला हात घालत मनसैनिकांना हनुमान चालीसाचे स्पीकर लावण्याचं आवाहन केलं. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे.
सुजात आंबेडकर म्हणाले की, ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावू. परंतु, हे स्पीकर लावण्यासाठी एकही बहुजन जाता कामा नये. घोषणा तुम्ही करणार आणि बहुजन कार्यकर्ता त्यात भरडला जाणार. माझी राज ठाकरे यांना विनंती आहे की, ते स्पीकर लावण्यासाठी अमित ठाकरे यांना पाठवा. तसेच अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा.
दरम्यान राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे दंगल झाल्यास पोलिसांना माहित आहे की पकडायचं कुणाला, असा टोलाही सुजात आंबेडकर यांनी लगावला आहे.
सुजात आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पुढील नियोजनासंदर्भातही मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, वंचितची सत्ता आणायची असेल तर घरोघरी जाणं गरजेचं आहे. मागील दोन निवडणुकांत लक्षात आलं की आपण स्वबळावर निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळे पुढील काळात इतर समाजातील लोकांना आपल्या पक्षाशी जोडायचं आहे.