नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कार्यरत सशस्त्र सैन्य दलाच्या वैद्यकीय सेवांच्या (एएफएमएस) कामकाजाचा आणि नागरी प्रशासनाला करत असलेल्या मदतीचा आढावा घेतला.
या बैठकीला संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, महासंचालक एएफएमएस लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी, महासंचालक (संघटना आणि कार्मिक) एएफएमएस लेफ्टनंट जनरल ए के हुडा, महासंचालक वैद्यकीय सेवा (नौदल) सर्जन व्हाईस ऍडमिरल एम व्ही सिंग आणि महासंचालक वैद्यकीय सेवा (वायू) एअर मार्शल एम एस बुटोला उपस्थित होते. यावेळी त्यांनी संरक्षण मंत्र्यांना सशस्त्र दलाच्या जवानांना सल्ला, सूचना देणे, विलगीकरण सुविधेबाबत नागरी प्रशासनाला मदत पुरविणे, सद्यस्थितीत रुग्णालये आणि आरोग्यसेवा केंद्रांची तरतूद करणे अशी अनेक कार्यांसंदर्भातील माहिती दिली.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार, नागरिकांसाठी विलगीकरण सुविधा केंद्र निर्माण केली असून सध्या इटली, इराण, चीन, मलेशिया आणि जपान येथून आलेल्या नागरी निर्वासितांसाठी सहा स्थानकांवर ही केंद्रे कार्यरत आहेत. इतर स्थानकांवरही स्टॅंडबाय विलगीकरण सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. 1 फेब्रुवारी 2020 पासून या सुविधा केंद्रात 1,738 व्यक्ती आहेत.
आयसीएमआरच्या मदतीने सहा विषाणू चाचणी प्रयोगशाळा यापूर्वीच स्थापित करण्यात आल्या असून विविध एएफएमएस रुग्णालयात त्या कार्यरत आहेत. संरक्षण मंत्रालयाने डीजीएस एमएसला दिलेल्या आपत्कालीन आर्थिक अधिकारानंतर चेहऱ्याचे मास्क, सॅनिटायझर्स, वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पीपीईएस), व्हेन्टिलेटर इत्यादी आवश्यक आरोग्य उपकरणांची खरेदी सुलभ आणि जलद गतीने होत आहे, अशी माहिती लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी यांनी दिली.
सैन्य वैद्यकीय दल सध्या नरेला, नवी दिल्ली येथे विलगीकरण शिबिरासाठी वैद्यकीय सेवा पुरवत असून तिथे सहा वैद्यकीय अधिकारी आणि 18 पॅरामेडिकल कर्मचारी कार्यरत आहेत. करोना रुग्णांच्या अलगीकरण आणि उपचारांसाठी (आयसीयु सुविधेसह), 50 एएफएमएस रुग्णालयांना समर्पित कोविड रुग्णालये आणि मिश्रित कोविड रुग्णालये म्हणून सूचित करण्याचे आदेश दिले आहेत. या रुग्णालयांमध्ये 9,038 रुग्णांसाठी खाटांची सुविधा उपलब्ध आहे.
सेवानिवृत्त एएमसी अधिकारी आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची यादी तयार केली असून गरज भासल्यास ते राहत असलेल्या ठिकाणी एएफएमएस रुग्णालयात त्यांना स्वच्छेने काम करण्याची विनंती केली जाऊ शकते. आतापर्यंत 43 अधिकारी आणि 990 पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा सेवा केली आहे.