संयुक्तराष्ट्रे: सध्याच्या करोनाच्या वातावरणात येमेन मध्ये तेथील सरकार आणि हौथी बंडखोरांमध्ये शांतता कराराला चालना देण्याचा मतप्रवाह तयार झाला असून त्याविषयीची चर्चा आता वेगाने पुढे सरकरत आहे. त्यामुळे त्या देशात आता लवकरच शांतता करार होईल, असे संयुक्तराष्ट्रांचे येमेन मधील विशेष दूत मार्टिन ग्रिफिफीथ्स यांनी म्हटले आहे.
येमेन मधील आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले सरकार हे सौदी आघाडीने पुरस्कृत केलेले सरकार असून तेथील शिया पंथीय हौथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. सरकारी फौजा आणि या बंडखोरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हिंसक संघर्ष सुरू आहे. तथापी आता या दोन्ही बाजू तेथे देशभर शांतता प्रस्थापित करण्यास राजी झाल्या आहेत असे या दूताने सांगितले आहे. मार्टिन ग्रिफिफीथ्स यांनी आपले हे मत संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळापुढे मांडले. ते म्हणाले की, आम्ही या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत असून दोन्ही बाजूंमधील मतभेद मिटवण्यासाठीचा प्रस्ताव आम्ही त्यांच्यापुढे सादर केला आहे. येमेनचे लष्कर आणि हौथी बंडखोरांमध्ये झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत एक लाख लोक मरण पावले आहेत.
संयुक्तराष्ट्रांच्या सरचिटणीसांनी केलेल्या आवाहनानुसार सौदी आघाडीने 9 एप्रिल रोजी येमेन मध्ये एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली आहे. पण ही शस्त्रसंधी हौथी बंडखोरांनी नाकारली होती. आमचा संघर्ष सुरूच राहील असे त्यांनी नमूद केले होते पण आता मात्र त्यांची भाषा काही प्रमाणात बदलली आहे. हे युद्ध आम्हालाही थांबवायचे आहे अशी स्पष्ट भूमिका हौथी बंडखोरांचे नेते अब्देल मलिक अल हौथी यांनी आपल्याबरोबर झालेल्या चर्चेत मांडली आहे अशी माहितीहीं मार्टिन यांनी दिली आहे.