डोर्लेवाडी -पिंपळी (बारामती) येथील युनायटेड स्प्रिट कंपनी समोरील रस्त्यावर शहर पोलीस, पिंपळी ग्रामपंचायतला न जुमानता चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला विक्री सुरू केली होती. सूचना देऊनही भाजीपाला विक्री बंद न केल्याने विक्रेते आणि ग्राहककांवर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या पथकाने गुरुवारी (दि. 23) 41 जणांवर कारवाई केली आहे.
बारामतीत सात करोना बाधित रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून एक करोनामुक्त झाला असून इतरांची प्रकृती ठणठणीत असून मंगळवार (दि. 28) पर्यंत करोना बाधित रुग्ण न आढळल्यास बारामती “ऑरेंज झोन’मध्ये जाणार आहे; मात्र संचारबंदी व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करीत असल्याने करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
यामुळे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात केली आहे. यामध्ये ग्राहक-विक्रेत्यांच्या दुचाकी व मालवाहतूक गाड्यांसह त्यांनाही ताब्यात घेतले आहे. भाजीपाला खरेदी-विक्री करणारे जवळपास 2 हजार जण येथे येत होते तर ते कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता गर्दी करीत होते. त्यामुळे या सर्वांवर 188 नुसार कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.