कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी बागवेंना निवडून द्या

आमदार विश्‍वजीत कदम यांचे मतदारांना आवाहन

पुणे  – पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांना निवडून द्यावे, असे आवाहन कॉंग्रेसचे आमदार विश्‍वजीत कदम यांनी रविवारी येथे केले.

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मंगळवार पेठ येथील श्रमिकनगर येथे महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कदम यांनी बागवे यांना पुन्हा संधी देण्याचे भावनिक आवाहन केले. नगरसेविका सुजाता शेट्टी, नगरसेवक रवींद्र धंगेकर, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, विजय चंडालिया, भगवान धुमाळ, सौ. नीलिमा लालबगे, रशीद खिजर, आमिर शेख, विजय खळदकर, विशाल मलके, सौ. वैशाली रेड्डी, नितीन परतानी, रवी आरडे, साहिल केदारी, राजेश शिंदे, वाल्मिकी जगताप, कल्पना भोसले यांच्यासह महाआघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कदम म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी खोटी आश्‍वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपने सर्वसामान्यांचे जीवन हलाखीचे करून टाकले आहे. बेरोजगारी, महागाई, मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्‍न हे सरकार सोडवू शकले नाही. नोटबंदी आणि जीएसटीने व्यापार, तरुण वर्ग देशोधडीस लागला. आता मात्र या सरकारला घरी बसवण्याची योग्य संधी आहे, अशी टीका करून त्यांनी, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, इतर घटक पक्षाचे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे उमेदवार रमेश बागवे यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले.

मागील पाच वर्षांत हा मतदार संघ भाजपच्या निष्क्रिय आमदाराने 25 वर्षे मागे नेऊन ठेवला. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे सर्वसामान्यांची दैना उडाली, 25 नागरिक मरण पावले. त्यावेळी भाजप नेते जल्लोष यात्रा काढण्यात मग्न होते. आपले पालकमंत्री पूर ओसरल्यावर पाहणी करायला आले. अशा लोकांना पुन्हा निवडून देऊ नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले. तर बागवे यांना सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून देण्यासाठी सर्वतोरी प्रयत्न करणार असल्याचे नगरसेविका सुजाता शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.