कलाटे, लांडेंना समर्थन : कॉंग्रेसच्या नाराजी नाट्यावर पडदा
पिंपरी – सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांविरोधात उमेदवार नसल्याने चिंचवड व भोसरी विधानसभा मतदार संघात सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत दिवसें-दिवस चुरशीची होत चालली आहे. चिंचवडचे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे व भोसरीचे विलास लांडे यांना कॉंग्रेस आणि मनसेने आज (रविवारी) पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे वंचित पाठोपाठ मनसेची मिळालेली साथ आणि कॉंग्रेसची नाराजी दूर करण्यात यश आल्याने मिळाल्याने पुरस्कृत उमेदवारांची ताकद वाढली आहे.
शिवसेनेचे गटनेते असलेले राहुल कलाटे यांनी चिंचवडमधून बंडखोरी केली आहे. तर माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी नाकारत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. सत्ताधाऱ्यांविरोधात सर्वपक्षियांची साथ मिळविण्याचा हा “पुरस्कृत उमेदवार पॅटर्न’ राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. वंचित बहुजन आघाडीने कलाटे व विलास लांडे यांना यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कलाटे व लांडे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत.
तथापि, आज मनसेच्या वतीने पुरस्कृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. पत्रकार परिषद घेत मनसेचे नेते बाबू वागस्कर व शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी याबाबतची घोषणा केली. त्यामुळे मनसैनिकांसाठी पुढची दिशा स्पष्ट झाली आहे. मनसेने शहरातील एकाही मतदार संघात उमेदवार दिला नाही. त्यामुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची पाठिंब्याबाबतची भूमिका स्पष्ट नसल्याने कार्यकर्ते तटस्थ भूमिकेत दिसत होते. परंतु, राज ठाकरे यांचे आदेश येताच मनसेसैनिकही राहुल कलाटे व विलास लांडे यांच्या प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे गेले काही महिने मरगळ आलेल्या मनसेमध्येही उत्साह संचारला असून पुरस्कृत उमेदवारांनाही बळ
मिळाले आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानंतर कॉंग्रेसची माघार –
मनसेपाठोपाठ कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनीही पत्रकार परिषद घेत पुरस्कृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. पुरस्कृत उमेदवारांवरुन शहर कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले होते. काही पदाधिकाऱ्यांनी पुरस्कृत उमेदवारांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली होती. अखेर आज या नाराजीनाट्यावर पडदा पडला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी समाधानकारक चर्चा झाल्यामुळे विलास लांडे व राहुल कलाटे यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे सचिन साठे यांनी सांगितले.