बोल्हेगाव परिसरात तहसीलदारांच्या पथकाने केली कारवाई
नगर – बोल्हेगाव येथील कळमकर यांच्या स्वस्त धान्य दुकानातून प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेले धान्य अवैधपणे गोण्यांमधून भरून ट्रॅक्टरने काळ्या बाजारात घेवून जात असतांना तहसीलदार उमेश पाटील यांच्या पथकाने पकडले. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबात तहसीलदार उमेश पाटील यांना 8 एप्रिल रोजी रात्री साडे आठ वाजता बोल्हेगाव येथील कळमकर यांच्या स्वस्त धान्य दुकानातून प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेले धान्य अवैधपणे गोण्यांमध्ये भरून ट्रॅक्टरने काळ्याबाजारात घेऊन जात असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार नागापूर येथील मंडळ अधिकारी श्रीनिवास आव्हाड यांच्या पथकास बोल्हेगाव येथे त्वरीत जाण्यास सांगितले. त्याचबरोबर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे व तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरून मुलाणी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानुसार अन्नधान्य वितरण अधिकारी पवार तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सध्या करोना विषाणूच्या संसर्गामुळे जीवनावश्यक वस्तू बाबत प्रत्येक नागरिक चिंतेत असताना नागरिकांना वस्तूंचा पुरवठा सुकर व्हावा यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांनी नियमांना अनुसरून धान्य वाटप करणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत परिपत्रकाद्वारे सर्व दुकानदारांना कडक सुचना देऊन सुद्धा काही दुकानदार माणुसकीला काळीमा फासण्याचे कृत्य करत आहेत.