काळ्याबाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य जप्त

शहरातील टांगे गल्लीतील प्रकार : जनआधार सामाजिक संघटनेने केला भांडाफोड

नगर – टांगे गल्ली येथील स्वस्त धान्य दुकानातील रेशनिंगचे धान्य विक्रीसाठी टेम्पोमध्ये भरला जात असताना जन आधार सामाजिक संघटनेचे प्रकाश पोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन रेशनिंग मालाच्या काळ्याबाजाराचा भांडाफोड केला. याबाबत जिल्हा पुरवठा विभागाला कळविले असता अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

जुन्या कोर्टाच्या मागील बाजूस असलेल्या टांगे गल्ली येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 1 मधून रेशनिंगचे धान्य दुसऱ्या गोण्यात भरून विक्रीसाठी नेले जात असल्याची माहिती पोटे यांना मिळाली. ते रेशनिंगच्या दुकानासमोर आले असता त्यांनी यासंदर्भात विचारणा केली असता माल टेम्पोत भरणाऱ्या व्यक्तींनी पळ काढला.

तर रेशन दुकान मालकाने दुकान बंद करुन घेतले. यानंतर पोटे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना फोन करुन माहिती दिली असता, पुरवठा विभागाचे अधिकारी गवळी यांनी धान्यांची तपासणी करुन पंचनामा केला. यावेळी दुकानाचा रेशनिंगचा परवाना रद्द करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.