नवी दिल्ली – पाकिस्तानातील कराची येथे राहणारी सीमा हैदर पबजी गेम खेळताना नोएडाच्या सचिनच्या संपर्कात आली. दोघेही प्रेमात पडले होते. प्रेम मिळविण्यासाठी सीमा हैदरने चार मुलांसह नेपाळमार्गे भारताच्या हद्दीत अवैधरित्या प्रवेश केला आणि राबुपुरा येथे राहू लागली. हा सर्व प्रकार उजेडात येताच संपूर्ण देशभरच नाही तर पाकिस्तानात देखील सचिन आणि सीमाच्या लव्ह स्टोरीची चर्चा रंगू लागली.
सीमासोबत भारतीय सचिनही सतत चर्चेत असतो. तूर्तास सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याच्या चर्चा संपुष्टात येऊ लागल्या आहेत. तपास यंत्रणांना सीमाबाबत असे कोणतेही पुरावे अद्याप तरी मिळालेले नाहीत, ज्यामुळे ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचे सिद्ध होऊ शकेल.
मात्र, अश्यातच सीमा हैदर आणि सचिन यांच्या बाबत एक बातमी समोर आली आहे. लवकरच सीमा-सचिन यांची जोडी प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ मध्ये सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल खुलासा केला आहे.
चाहते बिग बॉस 17 बद्दल खूप उत्सुक आहेत. अलीकडेच, बिग बॉस OTT 2 संपला आणि विजेता युट्यूबर एल्विश यादव झाला. आता सलमान खानचा शो बिग बॉसचा 17 वा सीझन उशिरा सुरू होणार असल्याचे वृत्त येत आहे. याचे कारण म्हणजे ऑक्टोबरपासून सुरू होणारा आयसीसी विश्वचषक 2023 होय. त्यामुळेच यंदा बिग बॉस थोडा उशिरा सुरु होणार आहे.
दरम्यान, सीमा हैदरने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे शोमध्ये ऑफर मिळाल्याबद्दल सांगितले आहे. तिने असेही सांगितले की, तिला सध्या शोमध्ये जाण्याची इच्छा नाही. जर ते बिग बॉसमध्ये सहभागी झाले तर या प्रकरणाची माहिती मीडिया आणि लोकांना नक्कीच दिली जाईल. असं ती म्हणाली. मात्र, या दोघांनीही आपण सध्या कोणत्याही शोमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितल्याची माहिती समोर येत आहे.