संयुक्त राष्ट्र – गाझामध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय त्वरित मानवतावादी मदत पाठवली जावी, अशी मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. हमास आणि इस्रायलदरम्यानच्या संघर्षाची शाश्वत समाप्ती केली जावी, यासाठी पूरक वातावरण करण्यात यावे, असेही या ठरावामध्ये म्हटले आहे.
संयुक्त अरब अमिरातीने मांडलेल्या ठरावावर किमान चार वेळा मतदान पुढे ढकलले गेले होते. सुरक्षा परिषदेच्या १५ सदस्यांच्या बैठकीमध्ये शुक्रवारी या ठरावावर मतदान करण्यात आले. ठरावाच्या बाजूने १३ मते पडली, तर विरोधात एकही मत पडले नाही. मात्र अमेरिका आणि रशियाने मतदानाच्यावेळी तटस्थ राहण्याचा पर्याय स्वीकारला.
संघर्षात गुंतलेल्या दोन्ही बाजूंनी संपूर्ण गाझा पट्यामध्ये तात्काळ, विनाअडथळा, आणि व्यापक मदत साहित्याच्या वाटपासाठी पावले उचलावीत. आणि स्थायी शांततेसाठी पोषक वातावरण निर्माण करावे, अशी मागणी ठरावात करण्यात आली आहे. सर्व सीमा आणि संपूर्ण गाझा पट्ट्यामधील सर्व मार्गांचा वापर करण्याची अनुमती देण्यात यावी, असेही या ठरावामध्ये म्हटले आहे.
मदत साहित्याचे वाटप आण फेरनिर्माणाच्या कार्यावर देखरेख करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ॲन्टोनिओ गुटरेस यांनी समन्वयकाची नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मदत वाटपासाठी पूर्वी संयुक्त अरब अमिरातीने मांडलेल्या आणिरशियाने दुरुस्ती सुचवलेला ठराव अमेरिकेने नकाराधिकार वापरून फेटाळून लावला होता.