नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या आवारात एक जुना ब्रिटीश कालीन बोगदा आढळून आला आहे. हा बोगदा विधानसभा ते लालकिल्ला याला जोडणारा आहे अशी माहिती विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल यांनी दिली.
ब्रिटीशांच्या काळात स्वातंत्र्य सैनिकांना ने आण करण्यासाठी या बोगद्याचा वापर केला जात असावा असा कयास आहे. गोयल म्हणाले की मी जेव्हा 1993 साली पहिल्यांदा आमदार झालो. त्यावेळी विधानभवनाच्या परिसरात अशा स्वरूपाचा बोगदा असल्याची माहिती मला मिळाली होती. मी इतिहासाच्या पानात डोकाऊन त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यात मला कोणतीही माहिती मिळाली नाही. या बोगद्याचा बराचसा भाग मेट्रोच्या कामात आणि पाईपलाईन टाकण्याच्या कामात कोसळला आहे. त्यामुळे आम्ही तेथे खोदकाम केले नाहीं असे ते म्हणाले. दिल्ली विधानसभेची जी इमारत आहे तेथे ब्रिटीशांनी कोर्ट स्थापन केले होते. त्या कोर्टात स्वातंत्र्य सैनिकांना आणण्यासाठी या बोगद्याचा बहुतांशी वापर होत असे.
याच भागात एक फाशी गेटही आहे असे समजले आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमीत्त आम्ही हे गेट उघडून तेथे स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक उभारण्याच्या विचारात आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी संबंधीत भाग असल्याने त्याला ऐतिहासिक मुल्य मोठे आहे असेही गोयल यांनी सांगितले.