काबुल – अफगाणिस्तानातील सरकार स्थापनेची तयारी तालिबानने पुर्ण करीत आणली आहे. मुल्ला बरादर याच्याकडेच अफगणिस्तानच्या अध्यक्षपदाची सूत्रे देण्याचे जवळपास निश्चीत झाले असून त्याची लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मुल्ला बरादर हा तालिबानच्या राजकीय शाखेचा प्रमुख आहे आणि तोच इतके दिवस तालिबानच्यावतीने अन्य देशांशी चर्चा करीत होता.
तालिबानचा मूळ संस्थापक मुल्ला उमर याचा मुलगा मुल्ला महंमद याकुब आणि शेर महंमद अब्बास स्थानकझाई हे बरादरला सरकार मध्ये मदत करतील आणि त्यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे स्थान असेल. तालिबानचे सर्व महत्वाचे नेते काबुलला जमले असून सरकार स्थापनेच्या संबंधातील बहुतांश बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. हैबतुल्ला अखुंदजादा हा तालिबानचा सर्वोच्च धार्मिक नेता असेल. तो इस्लामच्या चौकटीत सरकारचे काम चालले आहे की नाही यावर देखरेख करेल.
तालिबानच्या मंत्रिमंडळात 25 मंत्री असतील. मुस्लिम कायद्यांचे तज्ज्ञ असलेल्या 12 जणांची एक स्वतंत्र शुराही सरकारी चौकटीत स्थापन केली जाणार आहे. सहा ते आठ महिन्यांनी लोया जिरगा बोलावली जाईल. त्यात सर्व नवीन जुन्या सहकाऱ्यांना एकत्र आणून सरकारी कामाचे नियोजन आणि आढावा घेतला जाईल. पुढील आठवड्याच्या मध्याला हे सरकार प्रत्यक्ष सत्तेवर येईल असा अंदाज आहे.