श्रीगोंदा -जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याने श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने येथील सत्यम वाईन शॉप मंगळवारी (दि.12) दुपारी छापा टाकून सील केले.
सत्यम वाईनसमोर तळीरामाची मोठी रांग लागली होती. फिजीकल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते. दारू घेणाऱ्या ग्राहकांची नोंद नव्हती. थर्मल स्कॅनर नव्हते. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी आम्हाला त्रास होतो, अशा तक्रारी केल्या होत्या. याबरोबरच काही इलेक्ट्रॉनिक मोबाईल शॉपी बंद करण्यात आल्या.
जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य दुकाने सुरु झाल्याने शहरात गर्दी वाढली आहे. संचारबंदी व जमावबंदीची कशी अंमलबजावणी करावी? हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. या पथकात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक दिलीप मोटे आदी सहभागी झाले आहेत.