वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉनमधील काही शास्त्रज्ञांनी शरीरात बसवण्यासाठी अशी एक मायक्रोचीप तयार केली आहे ज्या आधारे शरीरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही विषाणूची ओळख पटू शकेल. पेंटॅगॉनशी संबंधित डिफेन्स ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी या संस्थेने याबाबतचे संशोधन पूर्ण केले आहे.
मायक्रो चिप तयार करणाऱ्या टीमचे प्रमुख विशेषज्ञ मेट हेपबर्न यांनी माहिती दिल्या प्रमाणे सध्या जगाला सतावत असणारी करोना महामारी ही शेवटची महामारी असणार आहे. नजीकच्या कालावधीमध्ये अशा प्रकारची कोणतीही महामारी जगाला त्रस्त करू शकणार नाही अशा प्रकारच्या कोणत्याही जैविक किंवा रासायनिक हल्ल्यासाठी मानवी शरीराची तयारी यापुढे केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.
डॉक्टर हेपबर्न यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शरीराच्या कोणत्याही भागात त्वचेखाली ही मायक्रोचीप बसवली जाऊ शकते या मायक्रोचीपच्या माध्यमातून शरीरात होणाऱ्या प्रत्येक रासायनिक प्रक्रियेची नोंद ठेवली जाते. एखाद्या विषाणूने शरीरावर हल्ला केला तर ते शरीर किती काळात संक्रमित होणार आहे याची माहितीही या मायक्रोचिपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. मायक्रोचीपमध्ये असलेल्या तंत्रज्ञानामुळे शरीरातील रक्ताची सातत्याने तपासणी केली जाईल.
एखाद्या विषाणूमुळे शरीरावर हल्ला केला तर तीन ते पाच मिनिटातच त्याबाबतचा निष्कर्ष समोर येऊ शकेल. त्यामुळे या विषाणूचा इतरत्र फैलाव होण्यावरही नियंत्रण ठेवता येणार आहे. संसर्गजन्य आजार फैलावणाऱ्या करोनासारख्या विषाणूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारचे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.