भुताच्या भीतीने जपानच्या पंतप्रधानांचे निवासस्थान रिकामे

निवासस्थान रिकामे असल्याने विनाकारणच त्याच्यावर वार्षिक 11 करोड रुपये खर्च

टोकियो : जपानच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान मानले गेलेले घर केवळ भुताच्या भीतीने गेली 9 वर्षे तसेच पडून असून तेथे सध्या कोणीही राहात नाही.  ‘सोटी कटोरी’ असे या जपानच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नाव असून या वास्तूवर भुताची छाया असल्याची अफवा असल्याने गेल्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये पंतप्रधान तेथे राहात नाही.

या वास्तूमध्ये गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक हिंसक घटना घडल्याने अशा प्रकारच्या हिंसेमध्ये मरण पावलेल्या लोकांचे आत्मे त्याठिकाणी भटकत असल्याची अफवा असल्याने ही वास्तू सध्या रिकामीच पडली आहे. जपानचे विद्यमान पंतप्रधान योशीहीडो सुगा हे सुद्धा या वास्तूमध्ये राहात नसून एका छोट्या घरांमध्ये सध्या ते वास्तव्यास आहेत.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सुगा यांची जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाली मात्र गेल्या 8 महिन्यांपासून त्यांनी या निवासस्थानाचा अधिकृत ताबा घेतलेला नसून जपानी संसद सदस्यांसाठी असलेल्या निवासस्थानामध्ये ते सध्या राहात आहेत. जपानच्या संसदेची इमारत असलेल्या भागातच पंतप्रधानांचे निवासस्थान असून ही इमारत एकूण 25 हजार चौरस फूट जमिनीवर उभारण्यात आली आहे. या जमिनीवर एकूण 6 विविध इमारती असून पंतप्रधानांच्या निवासासाठी काचे पासून बनवलेला एक महाल आहे. गेल्या 9 वर्षांपासून या महालामध्ये कोणीच पंतप्रधान राहात नाही.  पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अनेक हिंसक घटना घडल्याचे सांगितले जाते .

1932 मध्ये लष्कराच्या बंडानंतर तत्कालीन पंतप्रधानांना नौदलाच्या अधिकाऱ्यांनी याच निवासस्थानाबाहेर गोळ्या घालून ठार केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा झालेल्या एका घटनेत तत्कालीन पीएम कोकडा यांचे मेहुणे यांच्यासह 4 लोकांची हत्या करण्यात आली होती. 2001 ते 2006 या कालावधीत जपानचे पंतप्रधान असलेले चिरोकोई जीमो यांनी या निवास स्थानावरील भूतबाधा नष्ट व्हावी यासाठी एका शिंटो पूजाऱ्यालाही बोलावले असल्याचे समजते.

सध्या जपानमध्ये विरोधी पक्षनेते असलेले योशिहोको नोदा हे जपानचे पंतप्रधान असताना त्यांनी डिसेंबर 2012 पर्यंत याच निवासस्थाना मध्ये आपले वास्तव्य ठेवले होते. हे निवासस्थान रिकामे असल्याने विनाकारणच त्याच्यावर वार्षिक 11 करोड रुपये खर्च केले जात आहेत. त्यामुळे जपानच्या पंतप्रधानांनी या ठिकाणी राहायला यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.