नारायणगाव- जीएमआरटी विज्ञान प्रदर्शनास पहिल्याच दिवशी 13 हजार विज्ञान प्रेमींची भेट जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण जीएमआरटी खोडद येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी (शुक्रवारी) जवळपास 13 हजार विज्ञान प्रेमींनी भेट दिली, अशी माहिती प्रशासकीय अधिकारी व संयोजक डॉ. जे. के. सोळंकी व सहसंयोजक अ. भी. जोंधळे यांनी दिली.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नॅशनल रिमोट सेन्सिंग सेन्टर (इस्त्रो) हैदराबादचे शास्त्रज्ञ व निर्देशक शंतनू चौधरी यांच्या हस्ते झाले. या वेळी एनसीआरएचे निर्देशक प्रा. यशवंत गुप्ता, वित्त व प्रशासकीय प्रमुख जीएमआरटी डॉ. जे. के. सोळंकी, जीएमआरटीचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अ. भी. जोंधळे, डॉ. सदानंद राऊत, खोडदचे सरपंच विश्वास काळे, प्रा. रतिलाल बाबेल, वामन, समिती सदस्य इ. मान्यवर उपस्थित होते.
शंतनू चौधरी यांनी नॅशनल रिमोट सेन्सिंग सेन्टर (इस्त्रो) कशा प्रकारे देशाची सेवा करते याबद्दल मार्गदर्शन व विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. वैज्ञानिक क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात वैज्ञानिक क्षेत्रात काम करावे, असे नमूद केले. जीएमआरटी विज्ञान प्रदर्शनाचे कौतुक करत हा उपक्रम असाच अविरत चालू ठेवावा, अशी कामना केली.
तसेच विविध उपग्रहांची माहिती देत त्यांनी स्पेस ऑन व्हील्स या इस्रोच्या चालत्या फिरत्या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन केले. तसेच जीएमआरटी विज्ञान प्रदर्शन पाहून या देशात मोठे वैज्ञानिक तयार होतील अशी भावना व्यक्त केली. तसेच प्रदर्शनात भाग घेतलेल्या विध्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
प्रा. यशवंत गुप्ता यांनी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला हवेत म्हणजे वैज्ञनिक तयार होतील असे प्रतिपादन उद्घाटनावेळी केले. या वर्षी जीएमआरटी विज्ञान प्रदर्शनात 33 शाळा व 42 कॉलेज मिळून 200 प्रकल्प सादर झाले. तसेच जवळपास 20 शासकीय व निम-शासकीय संशोधन संस्थांनी आपला सहभाग नोंदविला. जीएमआरटी विज्ञान प्रदर्शन उद्या (शनिवारी) सकाळी 9 ते 4 पर्यंत सुरु असणार आहे, त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.