आता चेंडू प्राधिकरणाच्या कोर्टात ः वाहतूक पोलिसांकडून “नो पार्किंग झोन’बाबत झटका
पिंपरी : मोशी येथील पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालायाच्या प्रांगणात अस्त-व्यस्त वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या रोज निर्माण होते. यावर तोडगा म्हणून येथे “नो पार्किंग झोन’ घोषित करण्याची मागणी आरटीओने वाहतूक पोलिसांकडे केली होती.
परंतु वाहतूक पोलिसांनी “आरटीओ’लाच प्रश्न केला की “तुमच्याकडे पार्किंगची व्यवस्था आहे का? आधी नागरिकांना पार्किंगची सोय करुन द्या, नंतर “नो पार्किंग झोन’ घोषित करु. वाहतूक पोलिसांकडून असा झटका मिळाल्यानंतर आता आरटीओने येथील प्राधिकरणाच्या मोकळ्या जागेवर पे ऍण्ड पार्क तत्वावर पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली आहे. एकंदरीतच “आरटीओ’चा पार्किंगचा प्रश्न आणि वाहनांच्या विळख्यांची समस्या सध्या तरी सुटताना दिसत नाही.
पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाच्या अंतर्गत शहरासोबतच ग्रामीण भागातील मोठा हिस्सा येत आहे. यामुळे आरटीओ कार्यालयात वेगवेगळ्या कामांसाठी रोज हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात. पार्किंगची व्यवस्था नसल्याने कार्यालयाच्या बाहेर दुतर्फा वाहने उभी केली जाते.
बऱ्याचदा वाहने उभी करताना वाहनचालकांनी दाखविलेल्या बेशिस्तपणामुळे कार्यालयाच्या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होते. येथून ये-जा करणाऱ्या वाहनांसोबतच चालणेही नागरिकांना अवघड जात असल्याने आरटीओने वाहतूक पोलिसांकडे “नो पार्किंग झोन’ची मागणी केली होती.
भोसरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी पाहणी केल्यानंतर वाहनांसाठी प्रथम कार्यालयाकडून पार्किंगची व्यवस्था करण्यासंदर्भात कळवले आहे. येथे पार्किंगची सोय नसल्याने नागरिकांना वाहने रस्त्यावर लावावी लागत असल्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पार्किंगची सोय आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. ती सोय झाल्यानंतरच नो-पार्किंग झोन घोषित करण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे. मात्र, आरटीओ कार्यालयाकडे पार्किंगसाठी जागाच नसल्याने कार्यालयाने येथील नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या जागेवर “पे ऍण्ड पार्क’ तत्वानुसार पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी पत्राद्वारे प्राधिकरणाकडे केली आहे.
याबाबत आता प्राधिकरणाकडून कसा प्रतिसाद मिळणार यावर येथील पार्किंग समस्येचे भवितव्य अवलंबून आहे. आरटीओ परिसरात कामानिनित्ताने येणारी वाहने लावायची कुठे? असा प्रश्न वाहन चालकांना पडतो. नाइलाजाने नागरिकांना कार्यालयासमोरील रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्क करावी लागतात. यामुळे कार्यालयाला गराडा घातला जातो.