पारनेर – पारनेर तालुक्यातील पुणेवाडी येथील राम यशवंत रेपाळे यांची टाऊनशिप उभारणीकरिता ग्राहक कंपनीपाहून त्यांच्याशी व्यवहार करण्या करिता, तसेच जमिनीची कागदपत्रे जमा करण्यासाठी सात लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणेवाडी येथील राम यशवंत रेपाळे यांनी फिर्याद दिली असून, त्यात म्हटले आहे की फेब्रुवारी 2017 मध्ये हडपसर येथील व्यावसायिक नरेश अग्रवाल यांनी तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथील 100 एकरहून अधिक क्षेत्र असलेली जागा इंटरनॅशनल ट्रेडिंग करिता द्यायची आहे, त्यासाठी मध्यस्थी करा, असे सांगण्यात आले. त्याबाबतच्या अटीही त्यांनी सांगितल्या. तसेच सदर कामाच्या एकूण किमतीच्या दहा टक्के रक्कम ही आगाऊ व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर 15 टक्के मोबदला देण्याचे मला आश्वासन दिले होते.
त्याप्रमाणे मी नरेश अग्रवाल व उमेश अग्रवाल यांच्याशी व्यवहार करण्याचे ठरवले.
नरेश व उमेश अग्रवाल यांनी करारासाठी त्यांचा पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड ही कागदपत्रे कराराचा मसुदा तयार करण्याकरिता दिलेली होती. नरेश व उमेश अग्रवाल यांनी त्यांचे कामाचे सुरुवातीस दोन लाख रुपये अनामत रक्कम देणे करता सांगितल्याने मी माझे बॅंक ऑफ महाराष्ट्र पारनेर शाखा (ता. पारनेर) येथील खात्यावरून त्यांना त्यांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे दोन लाख रुपये ट्रान्सफर केले होते.
त्यानंतर मला उमेश अग्रवाल यांनी त्यांचे तुळजापूर येथील त्यांच्या मालकीचे जमिनीचे खरेदीखत व सात-बारा उतारे मला दिले. त्यानंतर माझ्या वकिलांमार्फत उमेश अग्रवाल यांच्याकडून प्राप्त कागदपत्रांची शहानिशा करून पडताळणी करून घेतली होती. त्यासाठी व इतर कामाकरिता माझे पाच लाख रुपये खर्च झाले. त्यानंतर मी अग्रवाल यांना माझ्याशी ठरलेल्या करार करण्याचा आग्रह धरला. मात्र त्यांनी तो करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे माझी सात लाख रुपयांची फसवणूक झाली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.